Sunday, June 17, 2007

तुझ्याचसाठी अन् तुझ्यामुळेच

Tujhyachsathi an tujhyamulech

दि. १५ मार्च २००७...

ती भेट मी कधीच विसरणार नाही

कारण... ती फक्त एक भेट नव्हती
होती एक आजन्म सुरुवात...

पहिल्या भेटीतच वाटलं मला
कि तूच ती माझ्यासाठी बनलेली
अगदी मला हवी होती तशी
मला समजून घेणारी

नजर तुझी तीक्ष्ण होती
प्रश्नच प्रश्न टाकत होती
कोडी ती उलगडताना
मला भुरळ पाडत होती

माझ्या डोळ्यात तुझी साठवण
अन स्वप्नांमध्ये आठवण होती
अशी दिवसरात्र भेटूनसुद्धा
भेट अपुरी वाटत होती

सुर्यकिरणांना न्याहाळत
उभी होतीस तू किनाऱ्यावर
आणि मी दूर सागरमध्यात
जहाजाच्या उंच चौथऱ्यावर

आता आर या पार
असाच होता तो क्षण
गाठेन मी किनाऱ्याला
अथवा या लाटांना अर्पण

उडी मारायची तर पाणी खोल
निर्णयाची होती घडी
पण तुझे वेड तर त्याहून खोल
म्हणूनच मी घेतली उडी

इकडून तिकडून लाटाच लाटा
येतच होत्या अंगावर
पण कुठल्याही लाटेचे आले नाही
दडपण कधी मनावर

ओढ मनातली माझ्या
बहुदा त्या पाण्यातही उतरली
म्हणूनच की काय ? प्रत्येक लाट
मला तुझ्याकडे नेणारीच भासली

खडतर प्रवास सुखकर झाला
जादूच जणू काहीतरी
तुझ्या वेड्या छंदानेच
घडली ही किमया सारी

तुझ्याचसाठी अन‍ तुझ्यामुळेच
आज मी किनाऱ्याला पोहोचलोय
आणि डोळ्यातल्या स्वप्नाला
आज डोळ्यासमोर पाहतोय

आता भेटलीस तशी
वारंवार भेटशील का तू मला?
पुढच्या पल्यावर सोबत म्हणून
बोलावशील का तू मला?

तुझ्याचसाठी अन् तुझ्यामुळेच
मला नव्या क्षितीजांना गाठत रहायचंय
अंतरे पार करताना तुझ्याच
वेड्या छंदात मला आजन्म गुंतायचंय

[प्रिय सखी GATE हीस ... सह्र्दय समर्पित]

~योगी...