Tuesday, July 26, 2005

गुरू

Guru

जन्मलात तेव्हा ; रडण्याशिवाय दुसरं काय येत होत ?
आज जे मिळवलतं ; ते गुरूशिवाय का शक्य होत ...

लागतं हातात घास धरून ; खायला सुद्धा शिकवावं
लागतं यशोमार्गावर धावण्याआधी ; उभं रहायला बोट कुणी धरावं

आज कुठे एवढ्या विषयांची मोठाली पुस्तकं वाचताय
पण जमलं असतं का हो ते ; आधी त्या मुळाक्षरांशिवाय

कुणी बसलं करायला जर कधी गुरूंची यादी
आई , वडील आणि शिक्षक आठवतील सगळ्यात आधी

ग्रंथ आणि अनुभव यांनीही बरचं काही शिकवलं
पडद्यामागच्या गुरूंमध्ये ; त्यांचच नाव पहिलं

लहान सहान गोष्टीसुद्धा ; सांगुन जातात बरेच काही
गुरू लपलेला असतॊ ; त्या सर्वांच्या ठायी

wheels, gears नी सांगितलं सतत गतीमान रहायला
electrons नी शिकवलं ; ऋण परत फेडायला

अणु-रेणुंनी शिकवलं ; रेशीमबंध जुळवायला
अन् computer ने सांगितलं प्रत्यॆक bit ला महत्व द्यायला

चांगलं काही शिकवणारा ; प्रत्यॆकजण गुरू असतो
वय किंवा मानानी लहान असला ; तरी तो लघु नसतो

अपयश आल्यावर आठवली होती भिंतीवरची मुंगी
कितीही वेळा पडली ; तरी चिकाटी होती अंगी

फळ्याखाली कोपऱ्यात ; खडुचा चुरा-चुरा झाला होता
दुसऱ्यांना शिकवण्यासाठी ; तो शेवटपर्यंत झिजला होता

अनेक ऊन-पाऊस झेलून ; पर्वत उभा निश्चलपणे
शिकवतॊ तो सुख-दुखा:ना सामॊरे जायला कणखरपणे

निखळ , निराकार मनाने वागणं दाखवलं पाण्यानॆ
चिखलात राहुनही पावित्र्य राखायला शिकवलं कमळाने

मध गोळा करते ती माशी जशी फुलांमधुन
तसे सद्गुण वेचायला शिका तुम्ही सर्वांकडून

मग रांगा नाही लावाव्या लागणार ; गुरूदर्शनासाठी
स्वत:हुन ते दर्शन देतील ; जळी , स्थळी आणि काष्ठी...

~ योगी...

Sunday, June 26, 2005

कविता 'मय'

Kavitamay

तु
रे कधी कवी झालास ? ; सवाल एकानॆ विचारला
अंतर्मुख झाल्यावर एक भाव प्रकट झाला

मन फक्त कविंनाच असतं ; झाला समज जेव्हा लोकांचा
तेव्हा जागा झाला ; कवी माझ्या मनातला

खरं पाहिलं तर मन सर्वांना असतं
आणि कवीचं अस्तित्व प्रत्येक मनात असतं

फक्त मनात वाकून बघा ; हरवून जा स्वत:च्याच विश्वात
मग काय कमी आहे हो तुमच्यात आणि आमच्यात

बघा मग कविता कशा सहज सुचतील
शब्द अपुरॆ पडावेत इतकॆ विचार मनात येतील

मनातल्या मौनाची गाठ अलगद सुटेल
अन् वाहत्या काव्याचा खळंखळं झरा फुटेल

शब्द किंवा भाषॆची आडवी यॆणार नाहीत बंधनं
ऎकू येतील सर्वांना तुमच्या ह्रदयाची स्फंदनं

कधी बघाल ; डोळॆ दिपून जातील अशी सौंदर्यसृष्टी
कवितातून कराल तिच्या कौतुकाची वृष्टी

कधी मनात प्रॆमाची कळी फुलून येईल
तिच्या सुगंधांनी कविता आसमंत भरू पाहिल

कधी दाटून येतील काळॆ मॆघ भावनांचॆ
त्यांना पाझरायला आहेत हे थॆंब कविताचे

कधी वादळॆ येतील तुम्हाला आडवं पाडायला
कविता उभ्या राहतील त्यांच्याशी झुंजायला

कधी प्रज्वलित होईल एखादी ज्योत विचारांची
कविता देईल सर तिला सुर्यप्रकाशाची

कविता कधी काल्पनिक ; तर कधी अनुभवांची
कधी साऱ्या दुनियेची ; तर कधी एकाकी वाटेवरची

कविताच्या या राज्यात शब्द राहतात संगी
अर्थांच्या आकारात अन् कल्पनांच्या रंगी

कवितांच्या वाटेवर येता येता घडतॆ असॆ काही
की माझी कविता ; का मी कवितांचा असा फरकच उरत नाही

साथ सॊडली आपुल्यांनी तरी कविता साथ सोडत नाही
इतका सच्चा साथी ; उभ्या आयुष्यात सापडत नाही

अशी होती ही सैर आमच्या कविताच्या राज्याची
वाट बघत आहॊत तुमच्या वारंवार येण्याची

~ योगी...