Tuesday, November 8, 2005

उरेल का... दिवाळी

Urel ka...Diwali

यंदाचीदिवाळी...
आली आणि गेली.
एक कविता याच दिवाळीवर

फटाका काय
उडत राहील
फक्त दारु संपेस तोवर

फराळ
काय
पोटात राहील
फक्त उद्या उजाडेस तोवर

कपडा काय
नवीन राहील
फक्त कॉलर मळेस तोवर

किल्ला काय
मांडला जाईल
फक्त मुले लहान तोवर

शुभेच्छा काय
वाचली जाईल
फक्त पत्र मिटेस तोवर

रांगोळी काय
देखणी राहील
फक्त फिसकटेस तोवर

पुजा काय
केली जाईल
फक्त तिथी पालटेस तोवर

ओवाळणी काय
टाकली जाईल
फक्त पैसा बोलतोय तोवर

दिवाळी काय
साजरी होईल
चार दिवस सरेस तोवर

मग ही चार दिवसांची राणी
अशी कितीशी पुरणारं ...
हे दिवस सरल्यावर
काहीच नाही का उरणारं ?

... ... ...

फटाका काय
उडत राहील
फक्त दारु संपेस तोवर
पण डोळ्यात साठवलेली आतषबाजी तर उरेल ना

फराळ
काय
पोटात राहील
फक्त उद्या उजाडेस तोवर
पण जिभेवर रेंगाळलेली ती चव तर उरेल ना

कपडा काय
नवीन राहील
फक्त कॉलर मळेस तोवर
पण त्या कॉलर मधली ताठ मान तर उरेल ना

किल्ला काय
मांडला जाईल
फक्त मुले लहान तोवर
पण इतिहासातुन मिळालेली प्रेरणा तर उरेल ना

शुभेच्छा काय
वाचली जाईल
फक्त पत्र मिटेस तोवर
पण त्यांच्यामागे जपलेली आपुलकी तर उरेल ना

रांगोळी काय
देखणी राहील
फक्त फिसकटेस तोवर
पण रेखाबद्ध जीवनातली रंगसंगती तर उरेल ना

पुजा काय
केली जाईल
फक्त तिथी पालटेस तोवर
पण पुजा केली त्याचं स्मरण तर उरेल ना

ओवाळणी काय
टाकली जाईल
फक्त पैसा बोलतोय तोवर
पण प्रेमानी बांधलेलं नाजुक नातं तर उरेल ना

दिवाळी काय
साजरी होईल
चार दिवस सरेस तोवर
पण चार दिवसांच्या कौतुकाची आठवण तर उरेल ना

मग ही चार दिवसांची राणी
अशी कितीशी पुरणारं ...
हे दिवस सरल्यावर
काहीच नाही का उरणारं ?

उरेल नक्की एक नियम...
काहीचं नसलं जरी सदैव उरणारं
तरी सगळं संपल्यावरसुद्धा
असतं खुप काही उरणारं

~ योगी...