Wednesday, May 19, 2021

अशी ही तशी ही

आज आई ची षष्ट्यब्दपूर्ती. 


त्यानिमित्त चिंतन करत असताना तिच्या स्वभावामधील अनेक पैलू समजले. त्यातले काही परस्पर विरोधी भासले. 

असाच विरोधाभास आपल्याला प्रत्येक व्यक्तिमत्वात आढळतो. त्या विरोधाभासाला अधोरेखित करणारी हि कविता. 


 अशी ही तशी ही 


कोणा भासे बोलणे हे, जणू खळखळ झरा 

कोणा मिळेल फक्त , मितभाषी नजारा 


कोणा वाटे लाघवी, साऱ्यांशी रीतच ऐसी 

कोणा धार शिस्तीची, भासे बिजली जैसी 


कोणी म्हणे असे ती,  अध्यात ना मध्यात 

कोणा दिसे झुंजार  लढवय्या तिच्यात 


कधी झेलिला कोणी तिरपा कटाक्ष बाणा 

कधी झेलिले तिने, गळून गेल्या कोणा 


कधी कठीण समयी आहे धाडसी ही  

कधी निर्णयाप्रती, सहमती शोधते ही 


कोणी म्हणे ही अखंड विद्यार्थी व्रती 

कोणी म्हणे आम्हासी मार्गदर्शका प्रती 


कधी सहज वृत्ती जिज्ञासू चौकस वाटे 

कधी चौकशा टाळत, ती कृतीत मग्न होते 


कसा विरोधाभास, हा एकाच माणसात 

पडतो सहज प्रश्न, आम्हास पामरास 


सापडले उत्तर जेव्हा, कृष्णाला आम्ही स्मरले 

एकाच मूर्तीमध्ये, नानाविध पैलू सजले 


प्रेमस्वरूप कान्हा, होतो कधी कठोर 

पार्थास धीर द्याया, कुरुक्षेत्रासमोर 


अनेक छटा दिसती , अशी ही तशी ही

त्याचेच रूप आहे , तुम्हा आम्हा मध्येही 


˜ योगी