Wednesday, March 7, 2007

धुंडाळण्यास वाटा नव्या

Dhundalnyas vata navya

<< घासून गुळगुळीत झालेल्या या वाटांना कंटाळलोय मी आता
वाटा नव्या धुंडाळू द‍यात , माझ्या मलाच आता

>> नंतर फजिती होईल वेड्या , धोपटमार्ग सोडू नकोस
चार पावसाळे जास्त पाहून सांगतोय , उरफाट्या निर्णय घेऊ नकोस

<< तुमची वाट शोधणाराही, आला होता असाच भटकत
हिणवलंच होतं त्यालाही तेव्हा , असंच वेडा ठरवतं
शहाण्यांच्या वाटांचे जनक , फक्त वेडेच होऊ शकलेत
वेगळ्या वाटांनी जाणारेच, सात शिखरं गाठू शकलेत

>> नशीब चांगलं म्हणून पोचले ते , तिथे गडगडण्याचीही शक्यता होती
त्यापेक्षा पहिल्या शिखरावर सुखरुप नेणारी , ही वाट काय वाईट होती

<< नशीब पहात बसले नाहीत, म्हणूनच तिथवर पोचले ते
धडपडले तरी वर जायची , जिद्द ठेवूनच चढले ते
तुमची वाट , पहिल्या शिखरानंतर अंतर्धान पावते
म्हणूनच तर मला ही वाट सोडाविशी वाटते

>> अनोळखी वाटेवर चुकलास तर दिशाही हरवून बसशील
पळत्याच्या मागे जाऊ नकोस , हातातलं ही घालवून बसशील

<< वाट चुकली तर थोडं मागे येऊन , पुन्हा नव्याने पुढे जायचं
आणि आपल्या फसण्यावर , स्वत:च गालातल्या गालात हसायचं
नवनिर्मितीच्या नशेचं गणित हे , तुम्हाला नाही झेपायचं
त्यासाठी वेडचं व्हावं लागतं , तिथे उभे राहून नाही समजायचं

>> यश गाठण्यासाठी , अपयश पचवायचीही ताकद लागते
नवी वाट पूर्णत्वास जाईल, याचीही खात्री नसते

<< अपयशानी मागे हटणार नाही, प्रयत्न मी सोडणार नाही
पूर्णत्वास नाही नेऊ शकलो, तरी वाट वाया जाणार नाही
नंतर असाच कोणी वेडा , माझ्या वाटेने चालून येईल
अन या अनामिक वेड‍यास धन्यवाद देत , ही वाट पुढे नेईल

>> आता तू इतकं ठरवलयंस तर मी अडवू शकत नाही
जपून जा रे बाळा ... याशिवाय आणखी शब्द फुटतं नाही

<< माहित नाही का बरं आज , पाऊल चटकन पुढे पडत नाही
स्वत:हून निघालोय तरी , मागे पाहिल्याशिवाय रहावत नाही
वाट सोडून चाललोय म्हणून , करु नका परकं मला
आशिर्वाद द‍या तुमचे , बळ हवयं त्यांचे , पुढच्या प्रवासाला

>> आशिर्वाद देताना आज खरतरं तुलाच नमस्कर करावासा वाटतो
तुझ्या रुपाने आज आम्ही , आमची सुप्त स्वप्ने उभी पाहतो

~ योगी...