Showing posts with label शुभ दिपावली. Show all posts
Showing posts with label शुभ दिपावली. Show all posts

Tuesday, October 24, 2006

शुभ दिपावली

Shubh Dipawali

शुभेच्छांच्या बरसातीतचं
दिवाळीचं आगमन व्हावं
सुख-शांतीची शिंपण करित
दिपावलीने तुमच्या दारी यावं

समृद्धीच्या रंगरंगोटीने
सारं घर सुशोभित व्हावं
सद्‌भावाच्या सुगंधानी
दाही दिशात भरुन जावं


photo courtesy: Rohit Mattoo

आनंदाच्या दीपांनी
अवघं जीवन उजळून यावं
आत्मविश्वासाच्या ज्योतिने
क्षणात मळभ झटकून द‍यावं

चैतन्याच्या अभ्यंगाने
उत्साहाला द्विगुणीत करावं
प्रयत्नांच्या रंगरेखांनी
यशाच्या रांगोळीला साकारावं

त्या प्रगतीच्या आतषबाजीने
कधी चांदणंही लाजावं
कर्तृत्वाच्या आकाशदीपाने
दिमाखात झळाळावं

नवस्वप्नांच्या सदऱ्याला
तुम्ही घडी मोडुन अंगावर घ्यावं
सद्‍गुणांच्या दागिन्यांनी
त्यावर शोभून दिसावं

त्या डोळ्यामधल्या कौतुकानी
मग निरांजनाचं रुप घ्यावं
अन् नात्यांमधल्या प्रेमानं
ओवाळणीचं पाकीट बनावं

या गोड आठवणींच्या पक्वानाला
मन भरेस तोवर खाऊन घ्यावं
आजच्या सारखेच उद्या होवो
म्हणत तृप्त तृप्त होऊन जावं

~ योगी...