Monday, September 26, 2005

आज मागतो

लाडका बाप्पा

तसं म्हणलं तर रोजच असतो तो समोर
पण आज त्या फोटोमधून आला तो बाहेर

त्याला पाहिलं तेव्हा काय करु ते उमगत नव्हतं
नैवेद्य दाखावावा म्हणलं तर पोट याचं आधीच भरलं होतं

सांगणार होतो
तुझी पूजा करायला आत्ता हातात या नाही काही
त्या आधी तोच म्हणाला
"अरे अशी पूजा करून घेण्यासाठी का इथे आलोय मी

आलोय ते फक्त तुझी भेट घ्यायला
बदल्यात भेट म्हणून तुला काय हवं ते द्यायला

माग रे बाळा आज काय हवं ते माग
आज तुझ्या मनातलं सगळं सगळं मला सांग"



काहीतरी मागणी असायचीच दरवेळी त्याला नमन करताना
पण या वेळी मोठा प्रश्न पडला काय हवं ते मागताना

आधी मागीतलेलं सगळं व्यर्थ आता वाटत होतं
चिरकालिन टिकेल असं काहीतरी आज मागयचं होतं

आधी वाटायचं की मागावं की - नशीबं माझं खुलावं
आज म्हणालॊ - स्वत: नशीब घडवण्याइतकं बळं हातात यावं
कारण - नशीब शोधत बसता कधी ते मिळतं नसतं
आपल्याच हातात असतं ते ; हातांवरच्या रेषात नसतं

आधी वाटायचं की मागावं की - मला नेहमी ठेव सुखात
आज म्हणालॊ - सुखाची किंमत राहो सदैव स्मरणात
कारण - ढिगभर असले तरी कुणाला ते कमीच पडते
किंमत कळल्यावर मात्र ; कणभरही पुरेसे वाटते

आधी वाटायचं की मागावं की - खुप किर्ती मला मिळू दे
आज म्हणालॊ - त्या आधी स्वत:ची ओळख मला पटू दे
कारण - स्वत:च स्वत:ला जोवर ओळखू शकलो नाही
तर जगभरानी ओळखलं ; ते काहीच खरं नाही

आधी वाटायचं की मागावं की - खुप मोठे आयुष्य मिळावे
आज म्हणालॊ - ध्येयपुर्तीसाठी आयुष्य अर्पण व्हावे
कारण - कितीही मिळालं तरी आयुष्य आहे संपणारं
अर्पण केलेले मात्र ; आहे त्यानंतरही उरणारं

आधी वाटायचं की मागावं की - माझ्या सर्व गरजा पुर्ण कर
आज म्हणालॊ - तू माझ्या गरजांनाच घाल आवर
कारण - आवरल्या नाहीत तर गरजांची वाढतच जाईल शेपूट
त्याउलट गरजांचीच गरज काय? विचारले ; तर होईल सगळ्यांचाच शेवट

आधी वाटायचं की मागावं की - लोकांनी मला प्रेमानी जवळ करावे
आज म्हणालॊ - कुठल्या प्रेमासाठी आसुसले नको रहाणे
कारण - प्रेम करताना परताव्याची अपेक्षा नाही बरी
निरपेक्षपणे प्रेम करणे हीच परिक्षा खरी

आधी वाटायचं की मागावं की - माझ्या सर्व इच्छा खऱ्या होऊ देत
आज म्हणालॊ - बाप्पा तू भेटल्यावर काही इच्छाच बाकी न राहु देत
कारण - तो भेटल्यावर इच्छा सगळ्याच संपून जातात
का इच्छा संपल्यावर मगच ; बाप्पा काय हवं ते माग म्हणतात ?

~ योगी...