Wednesday, June 30, 2010

बाबांना पत्र

बाबा,

हा blog तुम्हाला तिथे वाचायला मिळेल का हे मला माहित नाही...
पण माझ्या भावना तुमच्या पर्यंत नक्की पोहोचतील.
हे पत्र फक्त तुमच्यासाठी.
---

तुम्ही तत्काळ मध्ये booking केलतं ; कुणाला विचारलं ही नाही
अन गेलात त्या दूरदेशी; जिथून return ticket मिळत नाही

इकडे किती लोक आठवण काढतील याचा विचार सुद्धा केला नाही
उचकी लागली तर प्यायला... साधी पाण्याची बाटलीही घेतली नाही

नीट packing पण झालं नव्हतं; किती पसारा टाकून गेलात?
एवढा व्याप सावरण्याचे ; हे मोठे कोडे सोडून गेलात

म्हणायचा तुम्ही "बघ मी गेल्यावर किती रांग लागेल लोकांची"
पण ते दाखवून देण्यासाठी ; गरज होती का फोटोमध्ये जाण्याची?

तुम्हाला काय सांगू नंतर इथे माझी काय गत झाली
मनात अश्रूंची नदी फुटली ; अन डोळ्यात धरणं बांधावी लागली

मीच कोलमडलो तर कोण आवरेल हा पसारा ?
खचलेल्या आईला कोण देईल सहारा ?

हात पाय गाळून आता चालणारच नव्हतं
फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायचं होतं

डोळे मिटून घेतले ; अन आठवले तुमचे रूप
तुम्ही सुद्धा आयुष्यात दु:ख पचवलीत खूप

तोच बाणा मनात ठेवून मी डोळे उघडले
वास्तवाशी झुंज देण्यास दोन हात पुढे केले

तीच झुंज आजवर अखंडपणे चालू आहे
तुम्ही दिलेल्या धड्यांचा ; आशीर्वाद सोबत आहे

फोटोमधून तुम्ही बघत असाल असा भाबडा समज आहे
तुम्हाला माझा अभिमान वाटावा ; बस्स एवढीच अपेक्षा आहे

~ योगी...