Sunday, July 2, 2023

विसरून जा


कधी कधी खूप प्रयत्न करून सुद्धा हाती यश येत नाही. 

कोणीतरी पाठीवर हात ठेवून सांगतं सांत्वनपर दोन शब्द : "विसरून जा ... "

---

कर्म केलंस 

जीव ओतलास 

नाही मिळाली शाबासकी 

विसरून जा ...


गरज होती तेव्हा 

आधार दिलास तू 

संपली असेल गरज 

विसरून जा ...


निराश आहेस आत्ता 

पण खचून का जातोस?

होतील रे ऋतूबदल 

विसरून जा ...


किती विचार करशील 

अटळ असतात प्रश्न 

सापडतील रे उत्तरं 

विसरून जा ...


बरोबर होतं तुझं 

असं तुला वाटतं 

नसतील रे तेही चूक 

विसरून जा ...


काहूर माजलंय भावनांचं 

अशात तू एकटाच 

घे कवितेचा खांदा 

आणि विसरून जा ...  

~ योगी...