Sunday, October 13, 2013

सीमोल्लंघन


विजयादशमीच्या निमित्ताने ...
---


जन्माला आलो तेव्हा तर निरागस होतो
मोठा कधी झालो कळलेच नाही

या प्रवासात एक साथी मिळाला
कायमच माझ्या बरोबर ... अगदी सावली सारखा

माझ्या आनंदात तोही नाचायचा
अन माझ्या दु:खात स्तब्ध व्हायचा

माझ्या निर्णयांना पाठिंबा द्यायचा
माझ्या चुकांना सावरुन घ्यायचा

माझ्या बरोबर तोही मोठा होत गेला
आजूबाजूच्या लोकांशी खेळू लागला

प्रत्येका बरोबर होती त्याची एक सावली
सावल्यांच्या खेळाची अशी गोष्ट रंगली

छान दिसतात या सावल्या ... जेव्हा एकत्र उभ्या असतात
पण खूप जवळ आल्या तर एकमेकांच्या आड येतात

मग आपआपल्या सीमारेषा शोधू लागतात 
सीमा समजल्या नाही तर गैरसमज होतात

समज - गैरसमज या चक्रात आपण कधी गुंतलो कळत नाही
सावल्यांच्या वादात माणसं कधी दूरावली समजत नाही

नंतर उरते ती एकाकी सावली... फक्त सीमारेषा दाखवणारी
अन आतलं सगळं काळ्या अंधारात ठेवणारी

याच अंधारात मग आपल्या चूका दडून बसतात
वाटतं माझं कधीच नाही चुकत... बाकीचेच चुकतात

सगळ्यात मोठी चूक इथेच होते
सावल्यांच्या जाळ्यात माणसांची फसगत होते

दूर रहायच ठरवलं तरी ही सावली पिच्छा सोडत नाही
शेवटी माझ्याएवढीच ती ... तिला आवरणं एवढं सोपं नाही

सावली मिटवण्यासाठी स्वतः दिवा बनायला हवं
'मी' म्हणजे ही सावली नाही हे जाणायला हवं

विजयादशमीच्या दिवशी करु या सावलीचे सीमोल्लंघन
स्वयंप्रकाशी होऊन करू अहंकाराचे दहन

~ योगी ...