Sunday, October 7, 2018

एवढे फक्त लक्षात ठेव



आज ७ ऑक्टोबर ... माझ्या मुलीचा वाढदिवस. 
त्या निमित्त सुचलेली कविता. 
आज तिला समजणार नाही. कदाचित मोठी झाल्यावर समजेल.

एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 

खडतर मार्ग येतीलच  
पायी ठेच लागेलंच 
आठव तुझं पहिलं पडणं ...  
मला काहीच लागलं नाही 
रडू मला आलंच नाही 
म्हणत पुन्हा खेळली होतीस
जखम तिथेच विरली होती 
धडपडीला घाबरू नकोस 
चिकाटी सोडू नकोस 
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 


स्पर्धेत उडी घेशीलच
यशासाठी झटशीलच 
आठव लहानपणीचं खेळणं ... 
खेळताना कधी भूक विसरलीस
कधी जिंकलीस कधी हरलीस 
हरले जिंकले म्हणून थांबायचं नसतं 
कालच्या चूकातून शिकायचं असतं  
निकालांनी खचू नकोस
खेळातल्या मजेला मुकू नकोस 
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 

यक्ष प्रश्न पडतीलच
डोके सुन्न होईलच
आठव ते चित्रकोडे ... 
तू जोडलेला एकेक तुकडा
चित्र पूर्ण झाल्यावरचा मुखडा 
धागे दोरे शोधत रहा
मार्ग मिळत जातील पहा 
तेव्हाची जिज्ञासा हरवू नकोस
उत्तरं शोधणं थांबवू नकोस 
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 

कठीण सामने होतीलच
एकटे झगडावे लागेलच
आठव तुझं पहिलं पाऊल...   
स्वतःच दिलेस बोट सोडून 
ठेवलेस पाय घट्ट रोखून 
मग तुझे तुलाच जमत गेलं 
चालणे सहज होत गेलं 
आत्मनिर्भरता कायम ठेव
अविरत प्रयत्न चालू ठेव 
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 

मोठी तर तू होशीलंच
मान सन्मान मिळतीलच 
आठव तुझी निरागसता ... 
कधी खेळायचीस शिक्षक बनून  
अन एकटीचीच शाळा भरवून 
जगाचे सन्मान नावापुरतेच
खरे आनंद आपल्या पुरतेच 
विश्वाच्या पसाऱ्यात हरवू नकोस 
स्वतःमध्ये डोकवायला विसरू नकोस 
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव

नैराश्य कधी येईलच
देवाची आठवण होईलंच 
आठव ते शिल्पाचे गोळे ... 
मातीला तूच दिलास आकार
मग त्यालाच केलास नमस्कार  
त्या अंशाची अनुभूती आली
असीम शक्ती देऊन गेली 
प्रयत्नांच्या हाकेला धावून आला देव
तुझ्यामध्ये आहे तो यावर विश्वास ठेव  
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 

~ योगी ... 

Monday, September 17, 2018

आजि विठ्ठल भेटला


आज बर्लिन च्या मराठी मंडळाच्या गणेशोत्सवात श्रीधर फडके यांच्या स्वर-मैफिलीस जाण्याचा योग आला. 

आमच्या सारख्या कलोपासकांना श्रीधरजींना भेटायला मिळणे हे म्हणजे एका साधकाला विठ्ठलाने दर्शन दिल्या प्रमाणे आहे. याच भावना व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न:




नित्ये गुंजन करितो ज्याचे, तोचि सामोरी थाटला ।
याची देही याची डोळा , आजि विठ्ठल भेटला ।।
सरिता सिंधू ज्याचे कृपाळे, तोचि उगम पाहिला ।
योगी म्हणे क्षण भाग्याचा, कैसा अद्वया लाभला ।।





~ योगी...

Image courtesy : [1]