Sunday, July 2, 2023

विसरून जा


कधी कधी खूप प्रयत्न करून सुद्धा हाती यश येत नाही. 

कोणीतरी पाठीवर हात ठेवून सांगतं सांत्वनपर दोन शब्द : "विसरून जा ... "

---

कर्म केलंस 

जीव ओतलास 

नाही मिळाली शाबासकी 

विसरून जा ...


गरज होती तेव्हा 

आधार दिलास तू 

संपली असेल गरज 

विसरून जा ...


निराश आहेस आत्ता 

पण खचून का जातोस?

होतील रे ऋतूबदल 

विसरून जा ...


किती विचार करशील 

अटळ असतात प्रश्न 

सापडतील रे उत्तरं 

विसरून जा ...


बरोबर होतं तुझं 

असं तुला वाटतं 

नसतील रे तेही चूक 

विसरून जा ...


काहूर माजलंय भावनांचं 

अशात तू एकटाच 

घे कवितेचा खांदा 

आणि विसरून जा ...  

~ योगी... 

Wednesday, May 19, 2021

अशी ही तशी ही

आज आई ची षष्ट्यब्दपूर्ती. 


त्यानिमित्त चिंतन करत असताना तिच्या स्वभावामधील अनेक पैलू समजले. त्यातले काही परस्पर विरोधी भासले. 

असाच विरोधाभास आपल्याला प्रत्येक व्यक्तिमत्वात आढळतो. त्या विरोधाभासाला अधोरेखित करणारी हि कविता. 


 अशी ही तशी ही 


कोणा भासे बोलणे हे, जणू खळखळ झरा 

कोणा मिळेल फक्त , मितभाषी नजारा 


कोणा वाटे लाघवी, साऱ्यांशी रीतच ऐसी 

कोणा धार शिस्तीची, भासे बिजली जैसी 


कोणी म्हणे असे ती,  अध्यात ना मध्यात 

कोणा दिसे झुंजार  लढवय्या तिच्यात 


कधी झेलिला कोणी तिरपा कटाक्ष बाणा 

कधी झेलिले तिने, गळून गेल्या कोणा 


कधी कठीण समयी आहे धाडसी ही  

कधी निर्णयाप्रती, सहमती शोधते ही 


कोणी म्हणे ही अखंड विद्यार्थी व्रती 

कोणी म्हणे आम्हासी मार्गदर्शका प्रती 


कधी सहज वृत्ती जिज्ञासू चौकस वाटे 

कधी चौकशा टाळत, ती कृतीत मग्न होते 


कसा विरोधाभास, हा एकाच माणसात 

पडतो सहज प्रश्न, आम्हास पामरास 


सापडले उत्तर जेव्हा, कृष्णाला आम्ही स्मरले 

एकाच मूर्तीमध्ये, नानाविध पैलू सजले 


प्रेमस्वरूप कान्हा, होतो कधी कठोर 

पार्थास धीर द्याया, कुरुक्षेत्रासमोर 


अनेक छटा दिसती , अशी ही तशी ही

त्याचेच रूप आहे , तुम्हा आम्हा मध्येही 


˜ योगी 

  


 


Sunday, October 7, 2018

एवढे फक्त लक्षात ठेव



आज ७ ऑक्टोबर ... माझ्या मुलीचा वाढदिवस. 
त्या निमित्त सुचलेली कविता. 
आज तिला समजणार नाही. कदाचित मोठी झाल्यावर समजेल.

एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 

खडतर मार्ग येतीलच  
पायी ठेच लागेलंच 
आठव तुझं पहिलं पडणं ...  
मला काहीच लागलं नाही 
रडू मला आलंच नाही 
म्हणत पुन्हा खेळली होतीस
जखम तिथेच विरली होती 
धडपडीला घाबरू नकोस 
चिकाटी सोडू नकोस 
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 


स्पर्धेत उडी घेशीलच
यशासाठी झटशीलच 
आठव लहानपणीचं खेळणं ... 
खेळताना कधी भूक विसरलीस
कधी जिंकलीस कधी हरलीस 
हरले जिंकले म्हणून थांबायचं नसतं 
कालच्या चूकातून शिकायचं असतं  
निकालांनी खचू नकोस
खेळातल्या मजेला मुकू नकोस 
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 

यक्ष प्रश्न पडतीलच
डोके सुन्न होईलच
आठव ते चित्रकोडे ... 
तू जोडलेला एकेक तुकडा
चित्र पूर्ण झाल्यावरचा मुखडा 
धागे दोरे शोधत रहा
मार्ग मिळत जातील पहा 
तेव्हाची जिज्ञासा हरवू नकोस
उत्तरं शोधणं थांबवू नकोस 
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 

कठीण सामने होतीलच
एकटे झगडावे लागेलच
आठव तुझं पहिलं पाऊल...   
स्वतःच दिलेस बोट सोडून 
ठेवलेस पाय घट्ट रोखून 
मग तुझे तुलाच जमत गेलं 
चालणे सहज होत गेलं 
आत्मनिर्भरता कायम ठेव
अविरत प्रयत्न चालू ठेव 
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 

मोठी तर तू होशीलंच
मान सन्मान मिळतीलच 
आठव तुझी निरागसता ... 
कधी खेळायचीस शिक्षक बनून  
अन एकटीचीच शाळा भरवून 
जगाचे सन्मान नावापुरतेच
खरे आनंद आपल्या पुरतेच 
विश्वाच्या पसाऱ्यात हरवू नकोस 
स्वतःमध्ये डोकवायला विसरू नकोस 
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव

नैराश्य कधी येईलच
देवाची आठवण होईलंच 
आठव ते शिल्पाचे गोळे ... 
मातीला तूच दिलास आकार
मग त्यालाच केलास नमस्कार  
त्या अंशाची अनुभूती आली
असीम शक्ती देऊन गेली 
प्रयत्नांच्या हाकेला धावून आला देव
तुझ्यामध्ये आहे तो यावर विश्वास ठेव  
एवढे फक्त लक्षात ठेव 
कितीही मोठी झालीस तरी लहानपण ध्यानात ठेव 

~ योगी ... 

Monday, September 17, 2018

आजि विठ्ठल भेटला


आज बर्लिन च्या मराठी मंडळाच्या गणेशोत्सवात श्रीधर फडके यांच्या स्वर-मैफिलीस जाण्याचा योग आला. 

आमच्या सारख्या कलोपासकांना श्रीधरजींना भेटायला मिळणे हे म्हणजे एका साधकाला विठ्ठलाने दर्शन दिल्या प्रमाणे आहे. याच भावना व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न:




नित्ये गुंजन करितो ज्याचे, तोचि सामोरी थाटला ।
याची देही याची डोळा , आजि विठ्ठल भेटला ।।
सरिता सिंधू ज्याचे कृपाळे, तोचि उगम पाहिला ।
योगी म्हणे क्षण भाग्याचा, कैसा अद्वया लाभला ।।





~ योगी...

Image courtesy : [1]

Sunday, October 13, 2013

सीमोल्लंघन


विजयादशमीच्या निमित्ताने ...
---


जन्माला आलो तेव्हा तर निरागस होतो
मोठा कधी झालो कळलेच नाही

या प्रवासात एक साथी मिळाला
कायमच माझ्या बरोबर ... अगदी सावली सारखा

माझ्या आनंदात तोही नाचायचा
अन माझ्या दु:खात स्तब्ध व्हायचा

माझ्या निर्णयांना पाठिंबा द्यायचा
माझ्या चुकांना सावरुन घ्यायचा

माझ्या बरोबर तोही मोठा होत गेला
आजूबाजूच्या लोकांशी खेळू लागला

प्रत्येका बरोबर होती त्याची एक सावली
सावल्यांच्या खेळाची अशी गोष्ट रंगली

छान दिसतात या सावल्या ... जेव्हा एकत्र उभ्या असतात
पण खूप जवळ आल्या तर एकमेकांच्या आड येतात

मग आपआपल्या सीमारेषा शोधू लागतात 
सीमा समजल्या नाही तर गैरसमज होतात

समज - गैरसमज या चक्रात आपण कधी गुंतलो कळत नाही
सावल्यांच्या वादात माणसं कधी दूरावली समजत नाही

नंतर उरते ती एकाकी सावली... फक्त सीमारेषा दाखवणारी
अन आतलं सगळं काळ्या अंधारात ठेवणारी

याच अंधारात मग आपल्या चूका दडून बसतात
वाटतं माझं कधीच नाही चुकत... बाकीचेच चुकतात

सगळ्यात मोठी चूक इथेच होते
सावल्यांच्या जाळ्यात माणसांची फसगत होते

दूर रहायच ठरवलं तरी ही सावली पिच्छा सोडत नाही
शेवटी माझ्याएवढीच ती ... तिला आवरणं एवढं सोपं नाही

सावली मिटवण्यासाठी स्वतः दिवा बनायला हवं
'मी' म्हणजे ही सावली नाही हे जाणायला हवं

विजयादशमीच्या दिवशी करु या सावलीचे सीमोल्लंघन
स्वयंप्रकाशी होऊन करू अहंकाराचे दहन

~ योगी ...

Wednesday, June 30, 2010

बाबांना पत्र

बाबा,

हा blog तुम्हाला तिथे वाचायला मिळेल का हे मला माहित नाही...
पण माझ्या भावना तुमच्या पर्यंत नक्की पोहोचतील.
हे पत्र फक्त तुमच्यासाठी.
---

तुम्ही तत्काळ मध्ये booking केलतं ; कुणाला विचारलं ही नाही
अन गेलात त्या दूरदेशी; जिथून return ticket मिळत नाही

इकडे किती लोक आठवण काढतील याचा विचार सुद्धा केला नाही
उचकी लागली तर प्यायला... साधी पाण्याची बाटलीही घेतली नाही

नीट packing पण झालं नव्हतं; किती पसारा टाकून गेलात?
एवढा व्याप सावरण्याचे ; हे मोठे कोडे सोडून गेलात

म्हणायचा तुम्ही "बघ मी गेल्यावर किती रांग लागेल लोकांची"
पण ते दाखवून देण्यासाठी ; गरज होती का फोटोमध्ये जाण्याची?

तुम्हाला काय सांगू नंतर इथे माझी काय गत झाली
मनात अश्रूंची नदी फुटली ; अन डोळ्यात धरणं बांधावी लागली

मीच कोलमडलो तर कोण आवरेल हा पसारा ?
खचलेल्या आईला कोण देईल सहारा ?

हात पाय गाळून आता चालणारच नव्हतं
फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायचं होतं

डोळे मिटून घेतले ; अन आठवले तुमचे रूप
तुम्ही सुद्धा आयुष्यात दु:ख पचवलीत खूप

तोच बाणा मनात ठेवून मी डोळे उघडले
वास्तवाशी झुंज देण्यास दोन हात पुढे केले

तीच झुंज आजवर अखंडपणे चालू आहे
तुम्ही दिलेल्या धड्यांचा ; आशीर्वाद सोबत आहे

फोटोमधून तुम्ही बघत असाल असा भाबडा समज आहे
तुम्हाला माझा अभिमान वाटावा ; बस्स एवढीच अपेक्षा आहे

~ योगी...

Thursday, June 18, 2009

नि:शब्द

IIT मधले शेवटचे काही दिवस...
निरोप
घेताना मनात आलेल्या भावना टिपण्याचा एक प्रयत्न

आज या संध्याकाळी मी उभा इथे वळणावर
टाकतोय एक नजर या सरल्या वाटेवर

जुन्या आठवणींचा चित्रपट उभा एका डोळ्यासमोर
अन दुसरा डोळा डोकावतोय नव्या वाटांच्या क्षितिजावर

दोन डोळ्यांमध्ये मी हेलकावे घेतोय
एखाद्या लोलका सारखा
अन मागतोय शब्दांची साथ
जरा सावरण्यासाठी

पण...
आज शब्दही वाट हरवून बसलेत
मी झालोय पूर्णतः नि:शब्द

~ योगी...

Saturday, February 14, 2009

तू मला आवडतेस

आज व्हॅलेन्टाईन्स डे... त्यानिमित्त एक कविता
tu mala aavadtes

काय सांगू अन् कसं सांगू याचा खूप विचार केला

पण तू समोर आल्यावर सगळं काही विसरून जातो... म्हणून ही कविता

गेल्या काही दिवसांपासून माझे भान हरवले आहे

पण पोलीस चौकीत फिर्याद नोंदवून चोर सापडणार नाही... म्हणून ही कविता

तुझे दर्शन घेण्यासाठी मन माझे आतूर असते

पण रोज दर्शन मिळण्याचे भाग्य नशिबी नाही ... म्हणून ही कविता

तुझे हास्य पाहुनि माझा जीव धन्य होतो

चेहऱ्यावरची ती हास्याची कळी पुन्हा एकदा खुलावी... म्हणून ही कविता

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण मला आनंदी करतो

पण तो आनंद शब्दांमध्ये व्यक्त करणे शक्य नाही... म्हणून ही कविता

तुझ्याबरोबरच्या गप्पा कधीच संपू नये असं वाटतं

पण घडाळ्याच्या काट्यापुढे गप्पा अधुऱ्या राहतात... म्हणून ही कविता

तू गेल्यावर सुद्धा तुझेच विचार दिवसरात्र घोळतं राह्तात

पणं स्वप्न टिपण्यासाठी कॅमेरा मिळत नाही ... म्हणून ही कविता



डोळ्यांनी सांगून झालं , पण तुला समजलं नाही

किंवा समजून सुद्धा तू , न समजल्यासारखं करतेस... म्हणून ही कविता

एका वाक्यात सांगयचं तर तू मला आवडतेस

पण सविस्तर उत्तर लिहिल्याशिवाय पूर्ण गुण मिळत नाहीत... म्हणून ही कविता

~ योगी...

Wednesday, June 25, 2008

पल

Pal

Inspired from: याद आयेंगे ये पल from movie पल , and then Indian Idol version of it.

On the occasion of Thanks-giving-treat to our seniors; I am adding 3 more stanzas to the original version.
Dedicated to all our seniors who helped us a lot in our life at CSE, IIT Bombay.

@All seniors: Thanks a lot ... And have a great way ahead.

पल

हम रहे या ना रहे कल
कल, याद आयेंगे ये पल
पल, ये है प्यार के पल
चल आ मेरे संग चल

चल, सोचे क्या
छोटी सी है जिंदगी
कल, मिल जाए
तो होगी खुशनसीबी

हर मुश्किल मे साथी मिले तुम
किस्मत थी वो हमारी
भूल ना पाए तुम्हे कभी भी
ओ मेरे हमराही ...

राह अलग हो जाएगी कलसे
जुदा ना होगे फिर भी
दिल से बंधे है यारी के रिश्ते
तुटे ना ये कभी भी...

लाख कमाए, आगे बढकर
चाहे हम जितना भी
यहा जो पाया, मिले कही ना
धुण्डा सारा जहॉं भी ...

हम रहे या ना रहे कल
कल, याद आयेंगे ये पल

Sunday, June 17, 2007

तुझ्याचसाठी अन् तुझ्यामुळेच

Tujhyachsathi an tujhyamulech

दि. १५ मार्च २००७...

ती भेट मी कधीच विसरणार नाही

कारण... ती फक्त एक भेट नव्हती
होती एक आजन्म सुरुवात...

पहिल्या भेटीतच वाटलं मला
कि तूच ती माझ्यासाठी बनलेली
अगदी मला हवी होती तशी
मला समजून घेणारी

नजर तुझी तीक्ष्ण होती
प्रश्नच प्रश्न टाकत होती
कोडी ती उलगडताना
मला भुरळ पाडत होती

माझ्या डोळ्यात तुझी साठवण
अन स्वप्नांमध्ये आठवण होती
अशी दिवसरात्र भेटूनसुद्धा
भेट अपुरी वाटत होती

सुर्यकिरणांना न्याहाळत
उभी होतीस तू किनाऱ्यावर
आणि मी दूर सागरमध्यात
जहाजाच्या उंच चौथऱ्यावर

आता आर या पार
असाच होता तो क्षण
गाठेन मी किनाऱ्याला
अथवा या लाटांना अर्पण

उडी मारायची तर पाणी खोल
निर्णयाची होती घडी
पण तुझे वेड तर त्याहून खोल
म्हणूनच मी घेतली उडी

इकडून तिकडून लाटाच लाटा
येतच होत्या अंगावर
पण कुठल्याही लाटेचे आले नाही
दडपण कधी मनावर

ओढ मनातली माझ्या
बहुदा त्या पाण्यातही उतरली
म्हणूनच की काय ? प्रत्येक लाट
मला तुझ्याकडे नेणारीच भासली

खडतर प्रवास सुखकर झाला
जादूच जणू काहीतरी
तुझ्या वेड्या छंदानेच
घडली ही किमया सारी

तुझ्याचसाठी अन‍ तुझ्यामुळेच
आज मी किनाऱ्याला पोहोचलोय
आणि डोळ्यातल्या स्वप्नाला
आज डोळ्यासमोर पाहतोय

आता भेटलीस तशी
वारंवार भेटशील का तू मला?
पुढच्या पल्यावर सोबत म्हणून
बोलावशील का तू मला?

तुझ्याचसाठी अन् तुझ्यामुळेच
मला नव्या क्षितीजांना गाठत रहायचंय
अंतरे पार करताना तुझ्याच
वेड्या छंदात मला आजन्म गुंतायचंय

[प्रिय सखी GATE हीस ... सह्र्दय समर्पित]

~योगी...

Saturday, April 28, 2007

उद‌घाटन

Udghatan

मन मोकळं करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी कोणाची बरं आठवण होईल?
"तुमच्या लाडक्या मित्राची..."
हो. मला ही सर्वप्रथम त्याचीच आठवण झाली.

मग मी त्याला म्हटलं , "मन मोकळं करायला मी सगळ्यात आधी तुझ्याकडेच येतो. त्यामुळे 'मन मोकळे...' चे उद‌‍घाटन तुझ्याच हस्ते झाले पाहिजे."
तो म्हणाला , "ठीक आहे. No problem."

>>"अरे No problem काय? तुझ्याकडे Internet connection आहे का?
हं. एक काम कर. तू इकडे ये.
माझ्या शेजारी बसून माझा हा blog वाच. म्हणजे होईल उद‌घाटन."


<< "हं... बरं ...."
"पण तू एक गोष्ट विसरलास.
Internet connection
नसलं तरीही मी ते वाचू शकतो.
तुझ्या
मनातलं वाचायची link आहे माझ्याकडे.
सगळ्यांच्या
आधी वाचेन मी ते....अगदी तुझं लिहून पूर्ण होण्याच्या ही आधी."

तर अशा रितीने मी हे वाक्य लिहीपर्यंत त्याने या blog चे उद‌घाटन केलेही असेल। "

"अं
. काय विचारलतं? कोण आहे हा माझा मित्र ?"
अरे
हो तुमच्याशी ओळख करून द‍यायची राहिलीच.
"तर हा तो माझा लाडका मित्र"

link चालत नाहिये? बरोबर... कशी चालणार?
कारण...ती त्याच्या orkut profile ची link आहे. आणि त्याचे orkut profile अस्तित्वातच नाही.

"!dea ...photo पाठवतो."
पण तो ही एक problem आहे. कारण तो म्हणतोय की तो अदॄश्य आहे.
त्यामुळे त्याचा photo हि येणार नाही.

तरीही माझ्याकडे एक photo आहे. आणि मी माझ्या सोयीसाठी ; तो photo त्याचाच आहे असे समजतो.

तो photo तुम्हाला दाखवून ठेवतो. बघा. कुठे भेट झाली तर ओळख सांगा.
नक्की फायदा होईल त्याच्याशी ओळख असेल तर !!!




माझा लाडका मित्र
~योगी...

Friday, April 27, 2007

FAQ

Frequently Asked Questions

Before I start with my first post; let me clarify some of the common questions.

Q: How to read & write in Marathi Unicode script ?
Ans: Refer article Setup For Devanagari on Wikipedia.
This page gives comprehensive answer for this.

Q: How can I get updates about posts on this blog?
Ans: I would recommend you the following options
1. Subscribe to: Posts (Atom)
Using this you can get the updates in to your Google Reader or My Yahoo! or any other feed reader of your choice.
Read Wikipedia article on Web feed if you wish to know about advantages of this technology.
So this is first choice for recommendation.

2. Email Subscriptions powered by FeedBlitz
You can subscribe your email address in the form provided in the sidebar.
You will get the updates posted into your inbox on the next day.
FeedBlitz Privacy Policy mentions that they will not sell your email address to third parties.
This is recommended option if you do not check your feed reader regularly.
(I assume that you at least check your emails regularly.)

3. Visit http://yogiz.blogspot.com/ whenever you wish.
This is the simplest way.
But I cannot guarantee that you will get to see some new post every time you visit the page.
This is recommended option for regularly irregular net surfers
and for all others who does not fit into both of the above cases.

Q. What does 'before I start with my first post...'
mean when there are so many posts before this date?
Ans: I am actually starting this blog now. This is first time I am 'writing' for my blog.
All previous posts represents my collection of work before I think of blogging.
They are posted back-dated to reflect their original 'date of birth'.
So please...please... do believe that this is my starting point of blogging.

Q. Why I am getting so much boring in my first blog post?
Ans: Ooopps. Myself also trying to figure out the reason.
Yes.... I got the strong reason for it.
Since I am student of Dube Sir (Mr. D) ; I am habitual of it.
Ohhhh. no no no. I do not mean to say habitual of boring others.
Actually I meant to say habitual of documentation before development work.

No more boring after this....

Good bye.
See you with my 'first' post (Please take the current as zero'th since it is before first)
Ohhh. Let me stop writing this before i get bored again.


~ Devendr@...

Wednesday, March 7, 2007

धुंडाळण्यास वाटा नव्या

Dhundalnyas vata navya

<< घासून गुळगुळीत झालेल्या या वाटांना कंटाळलोय मी आता
वाटा नव्या धुंडाळू द‍यात , माझ्या मलाच आता

>> नंतर फजिती होईल वेड्या , धोपटमार्ग सोडू नकोस
चार पावसाळे जास्त पाहून सांगतोय , उरफाट्या निर्णय घेऊ नकोस

<< तुमची वाट शोधणाराही, आला होता असाच भटकत
हिणवलंच होतं त्यालाही तेव्हा , असंच वेडा ठरवतं
शहाण्यांच्या वाटांचे जनक , फक्त वेडेच होऊ शकलेत
वेगळ्या वाटांनी जाणारेच, सात शिखरं गाठू शकलेत

>> नशीब चांगलं म्हणून पोचले ते , तिथे गडगडण्याचीही शक्यता होती
त्यापेक्षा पहिल्या शिखरावर सुखरुप नेणारी , ही वाट काय वाईट होती

<< नशीब पहात बसले नाहीत, म्हणूनच तिथवर पोचले ते
धडपडले तरी वर जायची , जिद्द ठेवूनच चढले ते
तुमची वाट , पहिल्या शिखरानंतर अंतर्धान पावते
म्हणूनच तर मला ही वाट सोडाविशी वाटते

>> अनोळखी वाटेवर चुकलास तर दिशाही हरवून बसशील
पळत्याच्या मागे जाऊ नकोस , हातातलं ही घालवून बसशील

<< वाट चुकली तर थोडं मागे येऊन , पुन्हा नव्याने पुढे जायचं
आणि आपल्या फसण्यावर , स्वत:च गालातल्या गालात हसायचं
नवनिर्मितीच्या नशेचं गणित हे , तुम्हाला नाही झेपायचं
त्यासाठी वेडचं व्हावं लागतं , तिथे उभे राहून नाही समजायचं

>> यश गाठण्यासाठी , अपयश पचवायचीही ताकद लागते
नवी वाट पूर्णत्वास जाईल, याचीही खात्री नसते

<< अपयशानी मागे हटणार नाही, प्रयत्न मी सोडणार नाही
पूर्णत्वास नाही नेऊ शकलो, तरी वाट वाया जाणार नाही
नंतर असाच कोणी वेडा , माझ्या वाटेने चालून येईल
अन या अनामिक वेड‍यास धन्यवाद देत , ही वाट पुढे नेईल

>> आता तू इतकं ठरवलयंस तर मी अडवू शकत नाही
जपून जा रे बाळा ... याशिवाय आणखी शब्द फुटतं नाही

<< माहित नाही का बरं आज , पाऊल चटकन पुढे पडत नाही
स्वत:हून निघालोय तरी , मागे पाहिल्याशिवाय रहावत नाही
वाट सोडून चाललोय म्हणून , करु नका परकं मला
आशिर्वाद द‍या तुमचे , बळ हवयं त्यांचे , पुढच्या प्रवासाला

>> आशिर्वाद देताना आज खरतरं तुलाच नमस्कर करावासा वाटतो
तुझ्या रुपाने आज आम्ही , आमची सुप्त स्वप्ने उभी पाहतो

~ योगी...

Tuesday, October 24, 2006

शुभ दिपावली

Shubh Dipawali

शुभेच्छांच्या बरसातीतचं
दिवाळीचं आगमन व्हावं
सुख-शांतीची शिंपण करित
दिपावलीने तुमच्या दारी यावं

समृद्धीच्या रंगरंगोटीने
सारं घर सुशोभित व्हावं
सद्‌भावाच्या सुगंधानी
दाही दिशात भरुन जावं


photo courtesy: Rohit Mattoo

आनंदाच्या दीपांनी
अवघं जीवन उजळून यावं
आत्मविश्वासाच्या ज्योतिने
क्षणात मळभ झटकून द‍यावं

चैतन्याच्या अभ्यंगाने
उत्साहाला द्विगुणीत करावं
प्रयत्नांच्या रंगरेखांनी
यशाच्या रांगोळीला साकारावं

त्या प्रगतीच्या आतषबाजीने
कधी चांदणंही लाजावं
कर्तृत्वाच्या आकाशदीपाने
दिमाखात झळाळावं

नवस्वप्नांच्या सदऱ्याला
तुम्ही घडी मोडुन अंगावर घ्यावं
सद्‍गुणांच्या दागिन्यांनी
त्यावर शोभून दिसावं

त्या डोळ्यामधल्या कौतुकानी
मग निरांजनाचं रुप घ्यावं
अन् नात्यांमधल्या प्रेमानं
ओवाळणीचं पाकीट बनावं

या गोड आठवणींच्या पक्वानाला
मन भरेस तोवर खाऊन घ्यावं
आजच्या सारखेच उद्या होवो
म्हणत तृप्त तृप्त होऊन जावं

~ योगी...

Sunday, April 16, 2006

यु ही चला चल गाडी

आज आई-बाबांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली.
ही कविता खास त्यासाठी


२५ वर्ष धावत आली... पण ही गाडी कधी थांबली नाही
इतकं running होऊन सुद्धा ; प्रेमाचं petrol संपलं नाही

start केली तेव्हा ; सगळंच इथलं नविन होतं
एकमेकांचा अंदाज घेत ; हळुहळुचं पुढचं पाऊल होतं

पण frequencies tune व्हायला ; फारसे दिवस लागले नाहीत
गोष्टी sync मध्ये कशा आल्या ; त्यांचे त्यांनाही कळले नाही

पुढे काही वर्षात ; गाडीला दोन छोटी चाकं आली
बोटाला धरुन त्यांची ; मग चाली चाली ची शिकवण झाली

तेव्हा कुठे मोठी होऊन ती ; आज स्वत:च्या गतीने फिरतायत
आणि मोठी चाकं त्यांच्याकडे ; अभिमानाने बघतायत

एवढं लांब धावताना... वाटेत होते हर तऱ्हेचे रस्ते
कधी होते express way ; तर कधी खड्डेच खड्डे

एखाद्या खड्यात कुठलं चाक अडखळचं जर कधी
तर दुसरं चाक होतचं की; त्याला हात देण्यासाठी

एकदा एका रस्त्यावर ; एक चाक puncture झालं
तेव्हा दुसऱ्या चाकानं ; गाडीला अलगद balance केलं

कधी एका चाकाची बारीक कुरकुर ऎकु यायची
संध्याकाळी समजूत घालून ; त्याची servicing व्हायची

सकाळी oiling म्हणून ; मग गजऱ्याची भेट द्यायची
तेव्हा मोगऱ्याची कळी... थेट गालावरच खुलायची

petrol reserve ला गेलं; की गाडी ‘ भांडण पेट्रोलियम ’ च्या पंपावर
नंतर “परत इथे यायचं नाही हं ” म्हणतं ; निघायची पुढच्या रस्त्यावर

पुढचा प्रवास पुन्हा नव्या जोमाने सुरु व्हायचा
डोंगर दऱ्या पार करत ; non-stop चालूच रहायचा

गाडीने आज ओलांडला ; milestone २५ वर्षांचा
“ यु ही चला चल गाडी ” हीच देतो शुभेच्छा

~ योगी ...

Tuesday, November 8, 2005

उरेल का... दिवाळी

Urel ka...Diwali

यंदाचीदिवाळी...
आली आणि गेली.
एक कविता याच दिवाळीवर

फटाका काय
उडत राहील
फक्त दारु संपेस तोवर

फराळ
काय
पोटात राहील
फक्त उद्या उजाडेस तोवर

कपडा काय
नवीन राहील
फक्त कॉलर मळेस तोवर

किल्ला काय
मांडला जाईल
फक्त मुले लहान तोवर

शुभेच्छा काय
वाचली जाईल
फक्त पत्र मिटेस तोवर

रांगोळी काय
देखणी राहील
फक्त फिसकटेस तोवर

पुजा काय
केली जाईल
फक्त तिथी पालटेस तोवर

ओवाळणी काय
टाकली जाईल
फक्त पैसा बोलतोय तोवर

दिवाळी काय
साजरी होईल
चार दिवस सरेस तोवर

मग ही चार दिवसांची राणी
अशी कितीशी पुरणारं ...
हे दिवस सरल्यावर
काहीच नाही का उरणारं ?

... ... ...

फटाका काय
उडत राहील
फक्त दारु संपेस तोवर
पण डोळ्यात साठवलेली आतषबाजी तर उरेल ना

फराळ
काय
पोटात राहील
फक्त उद्या उजाडेस तोवर
पण जिभेवर रेंगाळलेली ती चव तर उरेल ना

कपडा काय
नवीन राहील
फक्त कॉलर मळेस तोवर
पण त्या कॉलर मधली ताठ मान तर उरेल ना

किल्ला काय
मांडला जाईल
फक्त मुले लहान तोवर
पण इतिहासातुन मिळालेली प्रेरणा तर उरेल ना

शुभेच्छा काय
वाचली जाईल
फक्त पत्र मिटेस तोवर
पण त्यांच्यामागे जपलेली आपुलकी तर उरेल ना

रांगोळी काय
देखणी राहील
फक्त फिसकटेस तोवर
पण रेखाबद्ध जीवनातली रंगसंगती तर उरेल ना

पुजा काय
केली जाईल
फक्त तिथी पालटेस तोवर
पण पुजा केली त्याचं स्मरण तर उरेल ना

ओवाळणी काय
टाकली जाईल
फक्त पैसा बोलतोय तोवर
पण प्रेमानी बांधलेलं नाजुक नातं तर उरेल ना

दिवाळी काय
साजरी होईल
चार दिवस सरेस तोवर
पण चार दिवसांच्या कौतुकाची आठवण तर उरेल ना

मग ही चार दिवसांची राणी
अशी कितीशी पुरणारं ...
हे दिवस सरल्यावर
काहीच नाही का उरणारं ?

उरेल नक्की एक नियम...
काहीचं नसलं जरी सदैव उरणारं
तरी सगळं संपल्यावरसुद्धा
असतं खुप काही उरणारं

~ योगी...

Monday, September 26, 2005

आज मागतो

लाडका बाप्पा

तसं म्हणलं तर रोजच असतो तो समोर
पण आज त्या फोटोमधून आला तो बाहेर

त्याला पाहिलं तेव्हा काय करु ते उमगत नव्हतं
नैवेद्य दाखावावा म्हणलं तर पोट याचं आधीच भरलं होतं

सांगणार होतो
तुझी पूजा करायला आत्ता हातात या नाही काही
त्या आधी तोच म्हणाला
"अरे अशी पूजा करून घेण्यासाठी का इथे आलोय मी

आलोय ते फक्त तुझी भेट घ्यायला
बदल्यात भेट म्हणून तुला काय हवं ते द्यायला

माग रे बाळा आज काय हवं ते माग
आज तुझ्या मनातलं सगळं सगळं मला सांग"



काहीतरी मागणी असायचीच दरवेळी त्याला नमन करताना
पण या वेळी मोठा प्रश्न पडला काय हवं ते मागताना

आधी मागीतलेलं सगळं व्यर्थ आता वाटत होतं
चिरकालिन टिकेल असं काहीतरी आज मागयचं होतं

आधी वाटायचं की मागावं की - नशीबं माझं खुलावं
आज म्हणालॊ - स्वत: नशीब घडवण्याइतकं बळं हातात यावं
कारण - नशीब शोधत बसता कधी ते मिळतं नसतं
आपल्याच हातात असतं ते ; हातांवरच्या रेषात नसतं

आधी वाटायचं की मागावं की - मला नेहमी ठेव सुखात
आज म्हणालॊ - सुखाची किंमत राहो सदैव स्मरणात
कारण - ढिगभर असले तरी कुणाला ते कमीच पडते
किंमत कळल्यावर मात्र ; कणभरही पुरेसे वाटते

आधी वाटायचं की मागावं की - खुप किर्ती मला मिळू दे
आज म्हणालॊ - त्या आधी स्वत:ची ओळख मला पटू दे
कारण - स्वत:च स्वत:ला जोवर ओळखू शकलो नाही
तर जगभरानी ओळखलं ; ते काहीच खरं नाही

आधी वाटायचं की मागावं की - खुप मोठे आयुष्य मिळावे
आज म्हणालॊ - ध्येयपुर्तीसाठी आयुष्य अर्पण व्हावे
कारण - कितीही मिळालं तरी आयुष्य आहे संपणारं
अर्पण केलेले मात्र ; आहे त्यानंतरही उरणारं

आधी वाटायचं की मागावं की - माझ्या सर्व गरजा पुर्ण कर
आज म्हणालॊ - तू माझ्या गरजांनाच घाल आवर
कारण - आवरल्या नाहीत तर गरजांची वाढतच जाईल शेपूट
त्याउलट गरजांचीच गरज काय? विचारले ; तर होईल सगळ्यांचाच शेवट

आधी वाटायचं की मागावं की - लोकांनी मला प्रेमानी जवळ करावे
आज म्हणालॊ - कुठल्या प्रेमासाठी आसुसले नको रहाणे
कारण - प्रेम करताना परताव्याची अपेक्षा नाही बरी
निरपेक्षपणे प्रेम करणे हीच परिक्षा खरी

आधी वाटायचं की मागावं की - माझ्या सर्व इच्छा खऱ्या होऊ देत
आज म्हणालॊ - बाप्पा तू भेटल्यावर काही इच्छाच बाकी न राहु देत
कारण - तो भेटल्यावर इच्छा सगळ्याच संपून जातात
का इच्छा संपल्यावर मगच ; बाप्पा काय हवं ते माग म्हणतात ?

~ योगी...

Sunday, July 31, 2005

Placement

आज दुपारचा तो sms वाचून close करवेना
बँक account मधे झाला ; पहिला पगार जमा

काय करायचे त्याची विचारचक्रे सुरु झाली
त्याच बरोबर मनात ; मगच्य आठवणींची गर्दी झाली

आठवले ते दिवस ; campus interview चे
placement साठी केलेल्या धडपडीचे

रोज खेळ सुरु होता ; apptitude अन technical चा
आज नाहीतर उद‍या दुसरा ; पुन्हा लढा द‍यायचा

better luck next time ऐकून ; कान जेव्हा थकले
स्वत:वर विश्वास ठेव सांगून ; हात मित्राने धरले

एक सखा थांबून राहीला ; selection ची party देण्यासाठी
दुसऱ्याने सत्यनाराणालाही थोपवले माझ्या placement साठी

आजच्या साठी all the best असं रोज म्हणायचे सगळे
सोबत होते आई बाबांचे आशेने भरलेले डोळे

एकच विचार दिवसभर डोक्यात भिनत होता
रात्रीच्या स्वप्नातही तोच किरकिरत होता

ठरवलं तेव्हा आता यश मिळेपर्यंत झगडायचं
depression ला आजच्या ; उद‍याचा confidence बनवायचं

confidence चा त्या अखेरीस विजय झाला
offer letter घेऊन एक दिवस माझाही आला

आईने स्वत: वाचण्याआधी ते ठेवले समोर देवाच्या
आणि म्हणाली कष्टांचे चीज झाले आज माझ्या लेकराच्या

मग आप्तेष्टांना फोन झाले ; गोड बातमी सांगायला
पेढे झाले , party झाली ; आनंद साजरा करायला

त्यानंतर चातकासारखी joining ची वाट बघत होतो
student मधून professional व्हायला उतावळा झालो होतो

आला तो उड्डाणाचा दिवस ; नव्या प्रवासाच्या आकाशात
नव्या आकांक्षा , नव्या क्षितीजांसह होतो नव्या उत्साहात

गोड welcome नी झाली सुरुवात नव्या गड्यांची team मध्ये
प्रथमदर्शनी सर्वच छान वाटले ; या नव्या वाटेमध्ये

interview चा पाहुणा म्हणून जी cofee प्यायली
तीच cofee आता इथे रोजची हक्काची झाली

पण...

तो कप share करायला table समोर कोणीही नव्हते
friendly environment असले तरी मित्र दूर गेले होते

open culture असले तरी आता मोकळे कुणी राहिले नव्हते
AC मध्ये बसताना ; पारावरच्या गप्पांचे रंग उडाले होते

आता उरले फक्त phone आणि IM वरचे बोलणे
लवकरच लक्षात आले ; आता शक्य नाही मागे फिरणे

थोडे साधे होते आधीचे दिवस ; पण नक्की होते आनंदी
खडतर असतील कदाचीत ; पण होते ते स्वछंदी

सुख मिळवण्यासाठी ; पैसा लागतो कमवायला...
का पैसा मिळवण्यासाठी ; सुख लागते गमवायला ?

या प्रश्नाचे उत्तर हवे ज्याचे त्याने शोधायला
का प्रत्येकालाच लागते कधीतरी या सोनाच्या पिंजऱ्यात यायला ?
~ योगी...

Tuesday, July 26, 2005

गुरू

Guru

जन्मलात तेव्हा ; रडण्याशिवाय दुसरं काय येत होत ?
आज जे मिळवलतं ; ते गुरूशिवाय का शक्य होत ...

लागतं हातात घास धरून ; खायला सुद्धा शिकवावं
लागतं यशोमार्गावर धावण्याआधी ; उभं रहायला बोट कुणी धरावं

आज कुठे एवढ्या विषयांची मोठाली पुस्तकं वाचताय
पण जमलं असतं का हो ते ; आधी त्या मुळाक्षरांशिवाय

कुणी बसलं करायला जर कधी गुरूंची यादी
आई , वडील आणि शिक्षक आठवतील सगळ्यात आधी

ग्रंथ आणि अनुभव यांनीही बरचं काही शिकवलं
पडद्यामागच्या गुरूंमध्ये ; त्यांचच नाव पहिलं

लहान सहान गोष्टीसुद्धा ; सांगुन जातात बरेच काही
गुरू लपलेला असतॊ ; त्या सर्वांच्या ठायी

wheels, gears नी सांगितलं सतत गतीमान रहायला
electrons नी शिकवलं ; ऋण परत फेडायला

अणु-रेणुंनी शिकवलं ; रेशीमबंध जुळवायला
अन् computer ने सांगितलं प्रत्यॆक bit ला महत्व द्यायला

चांगलं काही शिकवणारा ; प्रत्यॆकजण गुरू असतो
वय किंवा मानानी लहान असला ; तरी तो लघु नसतो

अपयश आल्यावर आठवली होती भिंतीवरची मुंगी
कितीही वेळा पडली ; तरी चिकाटी होती अंगी

फळ्याखाली कोपऱ्यात ; खडुचा चुरा-चुरा झाला होता
दुसऱ्यांना शिकवण्यासाठी ; तो शेवटपर्यंत झिजला होता

अनेक ऊन-पाऊस झेलून ; पर्वत उभा निश्चलपणे
शिकवतॊ तो सुख-दुखा:ना सामॊरे जायला कणखरपणे

निखळ , निराकार मनाने वागणं दाखवलं पाण्यानॆ
चिखलात राहुनही पावित्र्य राखायला शिकवलं कमळाने

मध गोळा करते ती माशी जशी फुलांमधुन
तसे सद्गुण वेचायला शिका तुम्ही सर्वांकडून

मग रांगा नाही लावाव्या लागणार ; गुरूदर्शनासाठी
स्वत:हुन ते दर्शन देतील ; जळी , स्थळी आणि काष्ठी...

~ योगी...

Sunday, June 26, 2005

कविता 'मय'

Kavitamay

तु
रे कधी कवी झालास ? ; सवाल एकानॆ विचारला
अंतर्मुख झाल्यावर एक भाव प्रकट झाला

मन फक्त कविंनाच असतं ; झाला समज जेव्हा लोकांचा
तेव्हा जागा झाला ; कवी माझ्या मनातला

खरं पाहिलं तर मन सर्वांना असतं
आणि कवीचं अस्तित्व प्रत्येक मनात असतं

फक्त मनात वाकून बघा ; हरवून जा स्वत:च्याच विश्वात
मग काय कमी आहे हो तुमच्यात आणि आमच्यात

बघा मग कविता कशा सहज सुचतील
शब्द अपुरॆ पडावेत इतकॆ विचार मनात येतील

मनातल्या मौनाची गाठ अलगद सुटेल
अन् वाहत्या काव्याचा खळंखळं झरा फुटेल

शब्द किंवा भाषॆची आडवी यॆणार नाहीत बंधनं
ऎकू येतील सर्वांना तुमच्या ह्रदयाची स्फंदनं

कधी बघाल ; डोळॆ दिपून जातील अशी सौंदर्यसृष्टी
कवितातून कराल तिच्या कौतुकाची वृष्टी

कधी मनात प्रॆमाची कळी फुलून येईल
तिच्या सुगंधांनी कविता आसमंत भरू पाहिल

कधी दाटून येतील काळॆ मॆघ भावनांचॆ
त्यांना पाझरायला आहेत हे थॆंब कविताचे

कधी वादळॆ येतील तुम्हाला आडवं पाडायला
कविता उभ्या राहतील त्यांच्याशी झुंजायला

कधी प्रज्वलित होईल एखादी ज्योत विचारांची
कविता देईल सर तिला सुर्यप्रकाशाची

कविता कधी काल्पनिक ; तर कधी अनुभवांची
कधी साऱ्या दुनियेची ; तर कधी एकाकी वाटेवरची

कविताच्या या राज्यात शब्द राहतात संगी
अर्थांच्या आकारात अन् कल्पनांच्या रंगी

कवितांच्या वाटेवर येता येता घडतॆ असॆ काही
की माझी कविता ; का मी कवितांचा असा फरकच उरत नाही

साथ सॊडली आपुल्यांनी तरी कविता साथ सोडत नाही
इतका सच्चा साथी ; उभ्या आयुष्यात सापडत नाही

अशी होती ही सैर आमच्या कविताच्या राज्याची
वाट बघत आहॊत तुमच्या वारंवार येण्याची

~ योगी...